रत्नागिरी:- नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन घातलेल्या अटींची पूर्तता करण्याच्या कार्यवाही नंतर परशुराम घाट रुंदीकरणाचे काम 25 एप्रिलपासून 25 मे 2022 पर्यंत घाटात साधारणपणे दुपारच्या वेळात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
या कामाला गती देवून पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.
काम सुरु करण्यापूर्वी घाटासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल याबाबतची माहिती फलक लावून द्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील म्हणाले. घाटात काही वळणांवर अपघात होण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी गतीरोधक आवश्यक आहे. त्याची उभारणी करा अशा सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस परिवहन आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.