परशुराम घाट ते वाकेड रस्त्याचे काम कुर्मगतीने

खासदार राऊत ; नितीन गडकरींशी चर्चा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामधील चिपळूण परशुराम घाट ते वाकेड (ता. लांजा) हा रस्ता मात्र अनेक वर्षापासून ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे आणि निष्क्रियतेमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अत्यंत कुर्मगतीने सुरू आहे. लांजा येथील उड्डाणपुलाचे काम मागील ४ वर्षांपासून बंद आहे. या महामार्गसंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन महामार्गचे रखडलेले काम आणि गणपतीपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त सुरक्षित करण्याचे सक्तीचे आदेश संबंधितांना द्यावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरी दिल्यानंतर पोलादपूर ते खेड आणि पुढे वाकेड (ता. लांजा) ते झारापपर्यंतचे (सिंधुदुर्ग) चौपदरीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे; परंतु चिपळूण परशुराम घाट ते वाकेड (ता. लांजा) हा रस्ता मात्र मागच्या अनेक वर्षापासून ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे आणि निष्क्रियतेमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अत्यंत कुर्मगतीने सुरू आहे. लांजा येथील उड्डाणपुलाचे काम मागील चार वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. चिपळूण परशुराम घाटातील रस्ता रेषा सखोल अभ्यासाअंती निश्चित न केल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामावेळी परशुराम घाट एका बाजूने कोसळण्यास सुरवात झाली आहे.
यावर्षी सुद्धा कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आणि परशुराम घाट ते वाकेड (ता. लांजा) दरम्यानचा सुमारे १०० किमी लांबीचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहने चालवणे अत्यंत मुश्किल होऊन गेले आहे. गणेशचतुर्थी उत्सव जवळ आला आहे. लाखो कोकणवासीय रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची बैठक घ्यावी आणि महामार्गचे रखडलेले काम आणि गणपतीपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त सुरक्षित करण्याचे सक्तीचे आदेश सर्व संबंधितांना द्यावेत व चाकरमानी मंडळींचा कोकणातील प्रवास सुखकर करावा, अशी भेट घेऊन मागणी केली.