परशुराम घाट आता दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद 

चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या कामात वाहतुकीमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी सकाळी ११ ते ५ या वेळेत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता नागरिक व लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सोयीनुसार या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा मार्ग 11 ऐवजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत वाहतुकीसाठी घाट बंद राहणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडू लागल्याने या कामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच घाटात काम सुरू असताना दगड कोसळून काही घरांचे नुकसानही झाले होते. या घटनेमुळे रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे अवघ्या महिनाभरात सुमारे दीडशे मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली. अजूनही काही भागातील संरक्षक भिंतीचे काम शिल्लक आहे.

मात्र, आता संबंधित कल्याण टोलवेज व ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या दरडीच्या बाजूने खोदाई सुरू केली आहे. सुमारे २३ मीटर उंच दरडीचा भाग असल्याने घाटातील हा अतिशय अवघड टप्पा मानला जात आहे. आता पावसाळ्यापूर्वी डोंगर कटाई करून तातडीने तेथेही संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी २५ हून अधिक पोकलेन, डंपर, डोजर अशी यंत्रणा कामाला लावली आहे.

साधारण २५ मे पासून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तयारी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण जून महिना हे काम सुरू ठेवले जाणार आहे. अशातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगार व अन्य नागरिकांच्या सूचनेनुसार या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आला असून तसे पत्र प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे.

‘या’ मार्गे वाहतूक मात्र ग्रामस्थ धुळीने हैराण

परशुराम घाट बंद असताना लोटे, चिरणी, कळंबस्ते या मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ येत असल्याने वाहतूकदारांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थही धुळीमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या पर्यायी मार्गावरही चिखल व अन्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.