रत्नागिरी:- परतीच्या पावसाचे सावट दिवाळीवर कायम आहे. शुक्रवारी (ता. २१) दुपारी अचानक रत्नागिरीमध्ये पडलेल्या जोरदार सरीने नागरिकांची तारांबळ उडाली. मारुती मंदिर परिसरात भरवस्तीत एका नारळाच्या झाडावर वीज पडली. झाडाच्या शेंड्याली आग लागली होती. पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवण्यात आली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
जिल्हयात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात ४.६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात चिपळूण १८ मिलीमीटर, संगमेश्वर २४ मिलीमीटर पाउस झाला. आज दूपारपर्यंत कडकडीत उन होते. उष्माही जाणवत होता. मात्र दूपारनंतर अचानक वातावरणात बदलाला सुरूवात झाली. आभाळ भरून आले आणि हलके वारे वाहू लागले. विजांचा कडकडाट सुरू झाला. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी शहरातील व्यापारी, नागरिक यांची तारांबळ उडाली. पावसाच्या शक्यतेने व्यापारी वर्गाकडून रस्त्यावर मांडलेली दूकाने सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ उडाली. तासाभरातच जोरदार पावसाला सुरूवात झाली. आकाशात विजांचे तांडव सुरू होते. ढगांच्या गडगडाटामुळे भितीचे वातावरण होते. मारूतीमंदिर येथे दुकाने, लोकवस्ती असलेल्या परिसरात एका नारळाच्या झाडावर ढगांचा गडगडाट होत असताना कडकडाट होत विज कोसळली. झाडाच्या शेंड्याच्या भागाला आग लागली. आग लागलेल्या झावळांचे किटाळ अन्य झाडांवर पडून ती वाढण्याची भिती होती. वीज पडल्याची गोष्ट लक्षात आल्यानंतर एका सजग नागरिकांने नगरपालिकेला कळवले. काही क्षणात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आग विझवली. जिल्हयात भात शेती कापणीची कामे वेगाने सुरू असून पावसामुळे त्यात खंड पडत आहे. अनेक शेतक-यांना कापलेले भात सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. कापलेली भातं पावसात भिजून गेली. वेळीच पाऊस थांबला असला तरी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.