परटवणे येथे अपघातानंतर दुचाकीस्वाराला मारहाण

रत्नागिरी:- शहरातील परटवणे चौक येथे रस्ता ओलांडणाऱ्या लहान मुलीला दुचाकीची धडक लागली. स्वार थांबला असताना तीन तरुणांनी स्वाराला मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद धुळप, सुमित धुळप, सुयोग धुळप (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजता परटवणे नाका येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यश मंगेश शिवलकर (वय २०, रा. सड्ये शिवलकरवाडी, रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एआर ९०४८) घेऊन परटवणेनाका येथे आले असता त्या ठिकाणी उभा असलेल्या मिनीबस च्या सुमोरुन एक लहान मुलगी रस्ता ओलांडत असताना यश शिवलकर यांच्या गाडीचा धडक लागली ते पुढे जाऊन थांबले असता अचानक तीन संशयितांनी तेथे येऊन शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत यश शिवलकर हे जखमी झाले. या प्रकरणी शिवलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.