परचुरी बावनदी पात्रात दोघेजण बुडाले, शोध सुरु

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे बावनदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले दोघेजण बुडल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या दोघांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. 

 परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे (35, परचुरी कळंबटेवाडी) आणि संकेत सहदेव कळंबटे (12) यांच्यासह अन्य पाचजण असे एकूण सातजण परचुरी येथील बावनदी मध्ये पोहायला गेले होते. भरती येत असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने संकेत कळंबटे बुडू लागला. तो बुडताना पाहताच प्रमोद कळंबटे यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोही पाण्यामध्ये बुडू लागला. त्यांच्यासोबत असलेल्या पाचजणांनी वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी बावनदीकडे धाव घेतली. मात्र त्या दोघांना वाचवण्यात त्यांना यश आलेले नाही. प्रमोद कळंबटे हा शिंपण्यासाठी गावाला आला होता. मात्र दोघेही सापडले नसल्याने परचुरी गावात खळबळ उडाली आहे.

 या घटनेची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे देशमुख यांना कळताच त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनीही शोध सुरू मात्र सायंकाळपर्यत त्यांचा शोध लागला नाही.