पनवेल येथील दोघेजण आरे वारे समुद्रात बुडाले, एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- समुद्रस्नानाचा मोह पनवेल येथील कुटुंबियांच्या अंगलट आला असून समुद्रात आंघोळीसाठी उतरलेले दोघेजण आरे वारे समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला असून दुसर्‍या वृद्धाला वाचविण्यात यश आले आहे.

15 ऑगस्ट निमित्त सुट्टीवर आलेले अनेक पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले. पावस, गणपतीपुळे आदी ठिकाणी दोन दिवस पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटकांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र पहिल्याच पर्यटन हंगामात रत्नागिरीत आरे समुद्रकिनारी दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथून एक कुटुंब पर्यटनासाठी रत्नागिरीत आले होते. खासगी वाहनाने ते रत्नागिरीत दाखल झाले. शनिवारी दुपारी ते गणपतीपुळेच्या दिशेने निघाले होते. वाटेतच आरे येथील निसर्गरम्य परिसराने त्यांना भुरळ पाडली.

आरे येथे गाडी थांबवल्यानंतर गाडीतून सर्वजण खाली उतरले आणि आरे समुद्रकिनारी निसर्गाचा आस्वास घेत ते फेरफटका मारण्यासाठी निघाले. समुद्रकिनारी बराचवेळ मौजमस्ती केल्यानंतर यातील काहींना समुद्रस्नानाचा मोह आवरला नाही.

एकीकडे समुद्राला अजूनही उधाण आलेले आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती त्यांना नसल्याने त्या कुटुंबातील दोघेजण आंघोळीसाठी आरे समुद्रात उतरले. थोडावेळ पाण्यात लाटांवर डुबक्या मारल्या. बघता बघता हे दोघे पाण्यात ओढले गेले आणि पुढे अनर्थ घडला.

पनवेल येथून आलेले सिद्धार्थ विनायक फासे (वय 19) व रविंद्र बिरादार (वय 50) हे उसळी घेणार्‍या लाटांमध्ये पाण्यात ओढले गेले आणि बघता बघता दोघेही गटांगळ्या खावू लागले. सिद्धार्थ व रविंद्र हे बुडत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पाहताच त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला.

या ठिकाणी झिपलाईनसह स्थानिक ग्रामस्थ यांना हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ समुद्राकडे धाव घेतली. अनेकांनी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र बुडालेले दोघेजण खोल पाण्यात ओढले जात होते. मोठ्या शिताफीने स्थानिक त्यांच्यापर्यंत पोहोचले.

या दुर्घटनेत सिद्धार्थ विनायक फासे (वय 19) या तरूणाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर रविंद्र बिरादार (वय 50) याला गंभीर अवस्थेत समुद्रातून बाहेर काढण्यात आले. हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी अनेक पर्यटक आरे समुद्रकिनारी होते. या समुद्रकिनारी मोठी गर्दी उसळली होती.

या दोघांनाही तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. सिद्धार्थ फासे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रविंद्र बिरादार यांच्यावर जिल्हा रूग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. याबाबतची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.