पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबेकरला अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी भादंवी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला अटक केली. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात येणार्‍या महेंद्रा थार गाडीचा आणि पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये वारीशे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, काल सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले (रा. तेलीआळी, रत्नागिरी) यांनी राजापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार थार चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.

काल मंगळवारी आरोपीला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता राजापूर न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, या अपघाताबाबत पोलिसांनी प्राथमिक तपास केला. त्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांनी सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरू शकेल अशा प्रकारे घटनेची नोंद घेतली. त्यानंतर भादंवी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला राजापूर न्यायालयात हजर केले असता, 7 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणाबाबत पोलीस सर्व बाबी तपासत आहेत. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.