पत्नीचा खून करुन फरार झालेल्या पतीला रत्नागिरीतून अटक

रत्नागिरी:- ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे पत्नीचा खून करणाऱ्या संशयिताला दिवा पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. प्रितेश काशिनाथ शिर्के (रा. दिवा, ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. पत्नीचा खूनानंतर प्रितेश फरार झाला होता. पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे रत्नागिरी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रितेश व त्याची पत्नी द्रौपदी हे दिवा येथे वास्तव्यास होते. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. याच रागातून १५ सप्टेंबर रोजी प्रितेश याने पत्नी द्रोपदी हिचा स्वयंपाकघरात धारधार शस्त्राने वार करुन खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रितेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अटक होईल, या भीतीने घटनेनंतर प्रितेश हा फरार झाला होता.

पोलिसांकडून प्रितेश याचा शोध घेण्यात येत असताना तो रत्नागिरी येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.