रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी पगार न झाल्याने गुरूवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे रूग्णालयात गोंधळ उडाला. रूग्णालयात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पडले होते. रूग्णालयात गणेशोत्सव साजरा होत आहे. रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील मनोरूग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे रूग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर आज शुक्रवारी वेतन देण्याचे आश्वासन ठेकेदाराच्या वतीने अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु मार्च 2023 पासून सफाई कर्मचारी पुरवण्याच्या ठेक्याची फाईल मंत्रालयात पडून असून सात महिने कोणतेही कारण नसताना ठेकेदार स्वतःच्या खिशातून कामगारांचे पगार देत असल्याचे पुढे आले आहे.
प्रादेशिक मनोरूग्णालया-मार्फत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या ठेक्याची मुदत फेब्रुवारी 2023 मध्येच संपुष्टात आली आहे. ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव रूग्णालयामार्फत संचालक कार्यालयाला पाठविण्यात आला होता. तेथून तो प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून आहे. आपल्याला मुदतवाढ मिळेल या आशेवर ठेकेदाराने काम बंद न करताना कर्मचाऱ्यांना पगार देणे सुरूच ठेवले होते. आर्थिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबरमध्ये देणे ठेकेदाराला शक्य झाले नाही.
सुमारे 15 कर्मचारी मनोरूग्णालयात कार्यरत आहेत. महिन्याला 9 हजार रुपये मिळणारे वेतन ऐन गणेशोत्सवात न मिळाल्याने गणेशोत्सव साजरा कसा करायचा? असा प्रश्न कर्मचाऱ्यांवर उभा राहिला. अखेर गुरूवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कामबंद आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर संपूर्ण रूग्णालयातील सफाईचे काम बंद करण्यात आले.
ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून असताना सफाईचे काम नियमितपणे सुरू असल्यामुळे या विषयाकडे गांभिर्याने न पाहणाऱ्या रूग्णालय प्रशासनाने तात्काळ वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून कामबंद आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर ठेकेदाराशी संपर्क साधून कामगारांचे वेतन देण्याची सूचना केली. त्यानुसार आज सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आश्वासन देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिले आहे.