पं. स. इमारत भूमिपूजन कार्यक्रमात अधिकाऱ्यांना ना. सामंतांकडून कानपिचक्या 

रत्नागिरी:- चांगल्या कामातही राजशिष्टाचार आडवा येतोय, अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवले पाहिजे, जनतेला वेठीस धरू नका, राजकारणी राजकारण करण्याचे त्यांचे काम करतात, ते सत्ताधारी असो किंवा विरोध परंतू अधिकाऱ्यांनी राजकारण करण्याचे कारण काय? तुम्हाला राजकारण करायचे असेल तर खुशाल करा, आम्ही थांबतो असे सांगत अधिकाऱ्यांकडून होणारे राजकारण वेदनादायी आहे. अधिकाऱ्यांनी वेळीच आवर घाला असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पंचायत समितीच्या नूतन वास्तुच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमीपूजन ना.सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलते होते. आपल्या भाषणात ना.सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह सर्वांचीच खरडपट्टी काढली.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती सौ.संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तहसीलदार शशिकांत जाधव, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला ना.सामंत यांच्या हस्ते भूमीपूजन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अल्पबचत सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इमारतीचे भूमीपूजन झाल्याचे ना.सामंत यांनी जाहीर केले. सुमारे 9 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी इमारत वर्षभरात पूर्ण करा अशी सूचना ना.सामंत यांनी ठेकेदाराला केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना राजकारण करू द्या. राजशिष्टाचार काय असतो हे मलाही माहीत आहे. अधिकारी जनतेचे सेवक आहेत. त्यांनी जनतेला वेठीस धरू नये. तुम्हाला अधिकार असतील. परंतु मंत्री म्हणून आम्हालाही अधिकार आहेत याचे भान ठेवा. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला अनेकवेळा मला निमंत्रण नसते. काहीवेळा कार्यक्रमापूर्वी सांगितले जाते. परंतु राजशिष्टाचार बाजुला ठेवून मी कार्यक्रमाला उपस्थित राहतो. जनतेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य आहे. येथे मी राजशिष्टाचार बघत बसत नाहीत. परंतु आज अधिकाऱ्यांना आवर घालण्याची वेळ आली असल्याचे ना.सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जिल्हा परिषदेचे प्रशासन नेमकं काय करतंय? हे तपासण्याची वेळ आली आहे. अथक प्रयत्न करून जिल्ह्याला रूग्णवाहिका दिल्या. त्या निवळीमध्येच उभ्या होत्या. आरोग्य अधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता नाही. सरकारी रूग्णवाहिका असुनही पासिंगसाठी आरटीओ कार्यालयाबाहेर तासन्‌‍तास उभ्या राहतात. परंतु अधिकाऱ्यांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. हेही गांभिर्याने घेणे गरजेचे असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले. 

उपसभापती उत्तम सावंत यांनी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांची नावे राहिली असतील तर परंतु जनतेचा कार्यक्रम म्हणून व मंत्री उपस्थित असताना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. हा पक्षीय नव्हे  शासकीय कार्यक्रम आहे याची गांभिर्याने दखल आपण घेतली आहे असे ना.सामंत म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील महिला बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मजगाव रोड येथील पालिकेच्या ताब्यात 12 गाळे महिला बचत गटांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यातील सहा गाळे ग्रामीण भागासाठी तर सहा गाळे शहरी भागासाठी बचत गटांसाठी असतील. यापुढील काळात महिला बचतगट सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. बचत गटांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पदार्थ करावेत. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.