पंधरा प्रभाग, दोन वार्ड आणि 30 नगरसेवक; रनपची बहुप्रभाग रचना कायम 

रत्नागिरी:- पालिकेच्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत नुकताच शासनाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला. त्यामुळे रत्नागिरी पालिकेची बहुप्रभाग रचना कायम राहिली आहे. १५ प्रभागामध्ये प्रत्येकी दोन वॉर्ड म्हणजे ३० सदस्य या वेळी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या प्रभाग रचनेमुळे एखाद्या चांगल्या उमेदवाराबरोबर डावा उमेदवारही निवडून येण्याची जास्त शक्यता असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.  

शासनाने काल बहु प्रभाग रचनेला मंजुरी दिली. याबाबत सत्ताधाऱ्यांमधील काँग्रेस पक्ष नाराज असला तरी निर्णयानुसार यंत्रणा कामाला लागली आहे. रत्नागिरी पालिकेचीही बहुप्रभाग रचनेनुसार ३० जणांसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. डिसेंबरला या पालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. कोरोना महामारीमुळे अजून निवडणूक कार्यक्रमाबाबत संभ्रम आहे. तरी दोन महिने निवडणूक पुढे जाणार असल्याचे गृहित धरून राजकीय पक्षांना मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. एकूण ३० जणांपैकी १७ जागा शिवसेनेकडे आहेत. २ अपक्ष उमेदवार कालांतराने शिवसेनेच्या गळाला लागल्यामुळे सेनेच्या सदस्यांची संख्या १९ झाली आहे. ६ भाजप तर ५ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. पालिकेतील हे राजकीय बलाबल असले तरी शिवसेनेने बहुमताच्या जोरावर अनेक विकासकामे केली; मात्र पाणीयोजना आणि खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे सेनेच्या सत्ताधाऱ्यांबाबत जनमत कलुषित होण्यास सुरवात झाली आहे; मात्र तेवढ्या ताकदीने विरोधकांनी हे प्रश्न उचलून धरलेले नाहीत. काही दिवसात या चुका दुरुस्त करून शहरवासीयांची मते जिंकण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. शहरात १५ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात २ वॉर्ड अशी ही रचना असणार आहे.