रत्नागिरी:- पंधरा वित्तमधून अबंधीत कामांसाठी जिल्ह्याला दुसर्या टप्प्यातून 32 कोटी 72 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 64 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला असून ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे प्रत्यक्षातील कामे अजुनही सुरु करता आलेली नाहीत. मार्च महिन्यात ही कामे वेगाने सुरु होतील असा अंदाज आहे.
विकास कामे कोणती करणे आवश्यक आहे, याचा निर्णय ग्रामपंचायतस्तरावर झाला तर निधी सत्कारणी लागू शकतो. या उद्देशाने केंद्र सरकारने 14 व्या वित्तचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा निधी पाच वर्षात मिळाला. रस्ते, पाखाड्यांसह अनेक महत्त्वाची कामे करता आली. पंधराव्या वित्तमध्ये 80 टक्के निधी ग्रामपंचायतीला, दहा टक्के जिल्हा परिषद आणि दहा टक्के पंचायत समितीला असा निर्णय झाला. 15 व्या वित्तमधून पहिल्या टप्प्यात ऑगस्ट 2020 मध्ये 64 कोटी रुपये मिळाले होते. त्याचा आराखडाही निश्चित करण्यात आला. त्यानंतर अबंधितसाठी दुसर्या टप्प्यातून 32 कोटी 72 लाख रुपये जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाला प्राप्त झाले आहेत. 80 टक्के निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे. हा निधी लोकसंख्येनुसार वितरित केला जातो. नऊ पंचायत समितींसाठी 3 कोटी 27 लाख रुपये मिळाले असून तेही लोकसंख्येनुसार वितरीत केले जाणार आहे.
* ग्रामपंचायत-26 कोटी 18 लाख 11 हजार रुपये
* पंचायत समिती -3 कोटी 27 लाख 26 हजार रुपये
* जिल्हा परिषद -3 कोटी 27 लाख 26 हजार रुपये