पंधराव्या वित्तच्या निधीतून जलजीवनच्या पाणी योजनांना मिळणार चालना 

रत्नागिरी:- पंधराव्या वित्तमधून ग्रामपंचायतींना देण्यात येणार्‍या निधीमधून जलजीवन मिशन आराखड्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी वापरावा असे आदेश राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत. याची कार्यवाही जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतींमध्ये होणार आहे.

गावोगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावर १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील पिण्याची पाणी, स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग आदी कामे या निधीच्या माध्यमातून केली जात आहेत. आता शासनाने पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी हा निधी वापरण्याचे आदेश दिले आहेत. जलजीवन मिशन राबवण्याकरता ग्रामपंचायती अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत आहेत. तसेच 15व्या वित्त आयोगांतर्ग ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी पाणी पुरवठा योजनांसाठी वापराबाबत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सूचना दिल्या आहेत. जल जीवन मिशनमध्ये केंद्र व राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला  आहे.

केंद्र व राज्य शासनाने जल जीवन मिशनसाठी दिलेला निधी मुदतीत खर्च होणे आवश्यक आहे. यापुढे घरगुती नळजोडणीची कामे पूर्ण करण्यासाठी जल जीवन मिशनअंतर्गत प्राप्त होणार्‍या निधीचा प्राधान्याने विनियोग करण्यात यावा. तसेच याकरता आवश्यक निधी सर्व ग्रामपंचायतींना व जिल्हा परिषदेला प्राप्त होईल, याची दक्षता राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशनने घ्यावी. जिल्हा परिषद स्तरावर सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणून देऊन तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे निधी अभावी प्रलंबित पडलेल्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नळ जोडणीच्या कामाला मिळणार गती

‘हर घर नल से जल’ या मोहिमेंतर्गत गावोगावातील प्रत्येक घरांना नळ कनेक्शन देण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यासाठी गावस्तरावर निधीची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनांसाठी निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नळ जोडणीच्या कामाला गती मिळणार आहे.