पंढरीनाथ आंबेरकरच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ 

रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातील मृत्युप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.    

राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे सोमवार दि.6 फेब्रुवारी रोजी राजापूर पेट्रोल पंपातून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून येणाऱया थार गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दुसऱया दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. या पकरणी वारीशे यांच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची तकार पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला दि.14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.  

या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी आंबेरकर याला राजापूर दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आंबेरकर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.