पंचायत समितीच्या माजी सभापती मारहाण प्रकरणात दोषारोप पत्रातून एकाचे नाव वगळले

रत्नागिरी:- पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत मारहाण प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले असून या दोषारोपातून एकाचे नाव वगळण्यात आले आहे. पोलिसांनी तपासाअंती भक्ती शिंदे या संशयिताचे नाव गुन्ह्यातून वगळले आहे. 

पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांना काही महिन्यांपूर्वी गोखले नाका येथे भर रस्त्यात मारहाण झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल झाली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पती सुकांत सावंत, पुजा सावंत-वायंगणकर व भक्ती शिंदे यांच्याविरोधात भा.दं.वि.कलम ३०७, ३९२, ४५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. 

याप्रकरणात शहर पोलिसांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तक्रारीत तिघांनी मारहाण केल्याचे स्वप्नाली सावंत यांनी नमूद केले होते. मात्र पोलीस तपासात भक्ती शिंदे या घटनास्थळी उपस्थित नव्हत्या, हे निष्पन्न झाल्याने त्यांचे नाव या गुन्ह्यातून वगळण्यात आले व दोघांविरोधातच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.