रत्नागिरी:- सेंट्रल किचनच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शाळांना माधान्य भोजन वाटप करण्याच्या पहिल्याच दिवशी शिर्के प्रशालेत न शिजलेला भात, बेचव वरण वाटप संबंधित ठेकेदाराने केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संस्थाचालक, शाळा व्यवस्थापनाकडून हा ठेका रद्द करुन जुन्या पध्दतीने वितरण सुरु ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वितरणाची जबाबदारी महिला बचत गटांकडून काढून नवीन ठेकेदार नेमण्यात आले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून परजिल्ह्यातील तीन संस्थांना निश्चित केल्या आहेत. रत्नागिरी नगरपालिका आणि पालिका शिक्षण मंडळामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. सोमवारपासून (ता. 1) ठेकेदारांनी पुरवठा करण्यास सुरवात केली. मात्र पहिल्याच दिवशी शहरातील शिर्के प्रशालेत कोल्हापूरच्या संस्कार महिला मंडळाने वितरीत केलेल्या आहारातील भात पुर्णतः शिजलेला नव्हता. वरण बेचव असल्याचे विद्यार्थ्यांकडून निदर्शनास आणून दिले गेले. काही विद्यार्थ्यांनी भात तसाच ठेवला. ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापकांनी पोषण आहारचे वितरण थांबवले. शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सुनिल पाटील यांनीही घटनास्थळी येऊन परिस्थिती पाहीली. या गोंधळात मुलांना सुमारे एक तास आहाराशिवायच राहावे लागले. संस्थांना ठेका देण्यापुर्वी दर्जाबाबतच्या सुचना दिलेल्या असतानाही याकडे कानाडोळा झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकाराबाबत शिक्षकांसह संस्थाचालकांकडून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सेंट्रल किचनमधून वितरीत होणार्या आहाराबाबतच साशंकता असल्यामुळे ती बंद करावी अशी मागणी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाही सतिश शेवडे यांनी केली आहे. आहार वाटप करणारे कर्मचारीही अस्वच्छ असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.