न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, रत्नागिरीतील माथाडी कामगार आक्रमक

रत्नागिरी:- एफसीआय गोदामातील धान्य तालुका गोदामात आणि तेथुन ते रास्त धान्य दुकानावर वितरीत केले जात होते. आता हे धान्य एफसीआय गोदामातून थेट रास्त धान्य दुकानात उतरले जाते. यामुळे माथाडी कामगारांजा हक्काचा रोजगार गेला. कामगार न्यायालयात गेल्यानंतर शहरी भाग वगळता ग्रामीण भागात पुर्वीप्रमाणे वाहतुक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. परंतु त्याची अंमलबजवाणी न
करता आदेशाचा अवमान केला आहे. लवकरात लवकर अंमलबजावणी न केल्यास आम्ही अवमान याचिका दाखल करू, असा इशारा माथाडी कामगार नेतृत्व करणारे भाजपचे नेते राजेश सावंत यांनी
दिला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दिलेल्या मानहानी कारक वागणुकीचाही त्यांनी निषेध केला. मंत्र्यांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगार प्रशांत पालकर,
विलास पवार आदी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, शहरातील माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणण्याचे काम जिल्हा पुरवठा विभाग करीत आहे. अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन या नोंदणीकृत संघटनेने न्यायालयाचे आदेश व त्या अनुषंगाने शासन निर्णयाची अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा
अधिकारी यांना पत्र दिले होते. त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रोहिणी रजपूत यांच्याकडून दिरंगाई करण्यात येत आहे. वरील शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील अन्नधान्य वाहतूक थेट गोदामापासून ते शिधावाटप दुकानापर्यंत न करता एफसीआय गोदामातून तालुकास्तरीय शासकीय गोदामापर्यंत करून त्यानंतर दुकानापर्यंत करावयाचे आहे. यामध्ये हमालांना रोजगार उपलब्ध होतो. परंतु ठेकेदाराच्या फायद्या करण्यासाठी थेट वाहतूक ही या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने होत आहे. हमालांवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेऊन नागरी विकास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सचिवांचे पत्र दिले तरीही यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. अशा प्रकारे न्यायालय, शासन व मंत्री यांचे अवमान करणारे कृत्य जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. रजपूत मॅडम यांनी केले आहे.

शासनाच्या आनंदाचा शिधा याबाबतही सौ. रजपूत यांच्या कार्यालयात दोनदा गेलो. परंतु त्यांनी साधी
दखलही घेतली नाही. उलट अत्यंत अपमानजनक वागणूक आम्हाला दिली. तरी जिल्हा पुरवठा अधिकारी व त्या विभागातील श्री. कोकरे यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलांबू व न्यायालयाच्या निर्णय न पाळल्यामुळे अवमान याचिका दाखल करू, असा राजेश सावंत यांनी इशारा दिला आहे.