मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची माहिती
रत्नागिरी:- नोव्हेंबरनंतर कधीही लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यास प्रशासकीय यंत्रणा तयार असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग फारच कमी असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे हे रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आजही अनेक घटक मतदानाच्या प्रवाहापासून दूर आहेत. या सर्व घटकांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणूक यंत्रणेचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
एकही नागरिक मतदान यादीत नाव येण्यापासून व मतदानापासून वंचित राहू नये यासाठी घर ते घर सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. बीएलओमार्फत हे सर्वेक्षण सुरु आहे. राज्यात आतापर्यंत 85 टक्के सर्वे पूर्ण झाला आहे. यामुळे प्रत्येक मतदाराचे सर्वेक्षण होणार आहे. जे मतदार घरी आढळणार नाहीत, त्यांची माहिती घेतली जाईल, त्यांना नोटीस देण्यात येणार आहेत. मतदार यादीतून नाव कमी करताना सात नंबर फॉर्म भरुन घेतला जाईल. बीएलओंपर्यंत पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली जाईल त्यानंतरच कमी केले जाणार आहे. मतदार यादी परिपूर्ण करण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदवून घेतले जाणार आहेत. या मतदार याद्यांचे ग्रामसभेत, प्रभाग वाचन केले जाणार आहे. यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
मतदान कार्ड व्यक्तीकडे असण्यापेक्षा मतदान यादीत आपले नाव असणे महत्वाचे आहे. मतदार यादीत नाव असेल तरच मतदानाचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रारुप यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीत नाव आहे की नाही याची खात्री करणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याचे देशातील राजकीय वातावरण वेगळे आहे. त्यामुळे समाज माध्यमातून फेकन्यूज वारंवार येत असतात. अशांना पायबंद बसावा यादृष्टीने कारवाईची पावलेही उचलली जाणार आहेत.
मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी विशेष अभियानही राबवले जाणार आहे. त्याचप्रमाणे 80 वर्षावरील व्यक्तींना घरबसल्याही मतदान करता येणार आहे. दिव्यांगानाही ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात 5 हजार 695 दिव्यांग असून, 59 हजारहून अधिक ऐंशी वर्षापेक्षा अधिक वृध्द व्यक्ती असल्याचीही माहिती त्यांनी दिली. सन 2019मध्ये आचारसंहिता भंगाचे 9 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील 7 गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटले सुरु असल्याचीही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, रत्नागिरी प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.
जिल्ह्यातील मतदार नोंदणी व अन्य कामे चांगल्या पध्दतीने सुरु असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व त्यांच्या सहकार्यांचे विशेष कौतुक केले.