रत्नागिरी:- नोकरीवरुन काढण्यास कारणीभूत ठरल्याच्या गैरसमजातून एकास चार जणांनी काठीने तसेच हातांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शनिवार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथे घडली.
संदिप सावंत (रा.बौध्दवाडी खेडशी,रत्नागिरी) आणि इतर 3 अज्ञातांविरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यांच्याविरोधात लक्ष्मण जोराराम बिश्नोई (33,रा.मिरजोळे,रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, संदिप सावंत आणि लक्ष्मण बिश्नोई हे दोघेही मिरजोळे एमआयडीसी येथील मनोरमा भारत गॅस एजन्सीमध्ये कामाला होते. त्यावेळी संदिप सावंत नेहमी दारुच्या नशेत कामावर येउन तेथे वाद-विवाद करायचा.त्यामुळे एजन्सीचे मालक शशिकांत सुर्वे आणि लक्ष्मण बिश्नोई या दोघांनी संदीपला तू दारुच्या नशेत कामावर येउन भांडणे करु नकोस असे वेळोवेळी सांगितले होते. परंतू संदिप ऐकत नव्हता,अखेर एजन्सीचे मालक शशिकांत सुर्वे यांनी संदिपला कामावरुन काढून टाकले.
त्यामुळे लक्ष्मण बिश्नोईमुळेच आपली नोकरी गेल्याचा गैरसमज संदिपने करुन घेतला. त्या रागातून शनिवारी सायंकाळी संदिप आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी संगनमताने लक्ष्मणला मिरजोळे येथील एजन्सीच्या गोडावूनमध्ये काठीने डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुकक्यांनी व हातांच्या थापटांनीही मारुन ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करत आहेत.