नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: आ. प्रसाद लाड 

रत्नागिरीः– मुंबई पोलीस दलातील अधिकारी दहशतवादी कृत्य करीत आहेत.सचिन वाझे मोठा गुन्हेगार असून सरकार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. एनआयएने भक्कम पुरावे गोळा केल्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. गृहमंत्र्यांचे तर तोंड काळे झाले आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावरहि मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केला. 

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सचिन वाझे प्रकरणात सरकार अडचणीत आले आहे. खंडणीसाठीच सचिन वाझे याने आंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली होती. राज्य सरकार सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना स्फोटकांमुळे या प्रकरणात लक्ष घालून तपास सुरु केल्याने सचिन वाझे सह राज्य सरकार अडचणीत आले आहे. 

या प्रकरणात केवळ सचिन वाझे नसून डीसीपी दर्जाचे दोन अधिकारी व अन्य कर्मचारी यांचाहि समावेश आहे. तेहि लवकरच गजाआड होतील असा विश्वास आ.लाड यांनी व्यक्त केला. एनआयएने कारवाई करण्यापुर्वी राज्य सरकारने सचिन वाझेला अटक करणे गरजेचे होते. यामुळे सरकारची इज्जत वाचली असती. परंतु सरकारने कारवाई करणे टाळल्याने राज्य सरकारची इज्जत गेली आहे. एक दोन अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल बदनाम होते. यावर गृहमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु गृहमंत्रीच गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. 

मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. काही वर्षापुर्वी शिवसेनेचा प्रवक्ता असलेला सचिन वाझे सेनेची सत्ता येताच पुन्हा पोलीस दलात आला. वरीष्ठ अधिकाऱ्यांचे पद असताना तेथे सचिन वाझेची नियुक्ती झालीच कशी? एकाच रात्री कमिटी बसवून सकाळी सचिन वाझेला ऑर्डर मिळाली. यामध्ये कोणाचा हात आहे हे राज्यातील जनतेला आता समजले असल्याचे आ.लाड यांनी सांगितले.