रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे राम रोड येथे एका आंबा आणि काजूची झाडे असलेल्या मोठ्या बागेला भीषण आग लागली. या आगीमध्ये सुमारे 1800 आंबा कलम आणि 1800 काजूची कलमे जळून खाक झाली आहेत.
याच बागेतून महावितरण कंपनीची वीज वाहिनी जाते. त्यामुळे शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याचं बागमालकाचं म्हणणं आहे. यापूर्वीही अशीच चार वेळा ही आग लागली होती मात्र अद्यापही महावितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे बाग मालक रमेश जैन यांनी सांगितले.
हि आग मंगळवारी सकाळी लागली असल्याचा अंदाज आहे. या आगीत बागेतील सुमारे 3600 आंबे काजूची कलमे ऐन हंगामात जळून खाक झाल्याने या बागमालक श्री. जैन यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते. सातत्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असताना महावितरण वीज कंपनी नेमकी नुकसान भरपाई कधी देणार असा प्रश्न बाग मालकांनी उपस्थित केला आहे.