निवळी येथे दुचाकीचा अपघात; एकजण ठार, दोघेजण जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-करबुडे मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात १ तरुण ठार तर दोनजण जखमी झाले. अपघाताची ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातामध्ये राजू फक्रुद्दीन शेख (४०, विक्रमनगर कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. जहांगिर आदम मुल्ला व अभिषेक उर्फ स्वप्नील वायंगडेकर (४१, बावनदी निबळी रत्नागिरी) अशी जखमी दोघांची नावे आहेत.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी रात्री अभिषेक बायंगडेकर हा जहांगिर व राजू शेख यांना दुचाकीवर घेऊन निवळी ते करबुडे असा जात होता. यावेळी निवळी येथील पाण्याची टाकी येथे दुचाकी आली असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूच्या चरात पडली. यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून राजू फक्रुद्दीन शेख याला मृत घोषित केले. तर अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.