रत्नागिरी:- न्यू कोयना प्रकल्पातून निवळीला जोडणार्या 225 केवी वीज वाहिनीसह निवळी येथील उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी रत्नागिरी शहरासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा खंडित झाला होता. तीन तास महावितरणच्या कर्मचार्यांनी भर पावसात केलेल्या प्रयत्नामुळे रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु निवळी-पावस मार्गावरील वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने रत्नागिरी राजापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामध्ये मुसळधार पावसाचा व्यत्यय कायम होता .
दोन दिवस कडक उकाडा जाणवत होता. अशातच गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री सात वाजण्याचे सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याचा फटका महावितरणला बसला. न्यू कोयना प्रकल्पातून
निवळीला जोडणार्या 225 केवी वीजवाहिनीसह निवळी उपकेंद्रात बिघाड होऊन रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वीज पुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसात महावितरणच्या कर्मचार्यांनी कोयना ते निवळी या मार्गावरील लाईनमध्ये असलेला बिघाड तीन तासात दुरुस्त करून निवळीसह सबस्टेशनमध्ये बिघाड काढला. त्यानंतर रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला. परंतु निवळी उपकेंद्रतून पावससह सिंधुदुर्गला जोडणार्या लाईन मध्ये झालेला बिघाड काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मुसळधार पावसामुळे त्यामध्ये वारंवार व्यत्यय येत होता. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांसह इतर अधिकारी, कर्मचारी लाईन मधील बिघाड काढण्यात व्यस्त होते. परंतु पावसाचा अडथळा कायम राहिला होता.