निवडणूकीच्या रणधूमाळीत महिला सरपंचासह लिपिक बेपत्ता

रत्नागिरी:- देशासह राज्यात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात प्रचारांचा धुरळा उडत असतानाच रत्नागिरी तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गानजिक ‘चर’ ‘वेली’च्या वरच्या भागात असलेल्या गावातील महिला सरपंचासह त्याच ग्रामपंचायतीतील लिपिक अचानक गायब झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोघे एकाच वेळी गायब झाल्याने त्यांचे अपहरण झाले का? ते स्वत:हून गायब झाले आहेत ? याचीच चर्चा तालुक्यात सुरु असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली आहे. याला ग्रामीण पोलीसांनी दुजोरा दिला आहे.

रत्नागिरी तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गानजिक ‘चर’ ‘वेली’च्या वरच्या भागात असलेल्या गावातील महिला सरपंच व त्या कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीतील लिपिक एकाच वेळी गायब झाले आहे. दोघेही एकाच गावातील असून ते अचानक गायब झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. मतदार संघात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. लोकसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भारण्याचा सुरुवात होण्याच्या आदल्याच दिवशी दोघेही गायब झाल्याने चर्चा अधिकच वाढली आहे.

दोघे एकाच वेळी बेपत्ता कसे झाले ? याचा शोध पोलीस घेत आहेत. सरपंचाचसह लिपिकाचे अपहरण झाले तर ? त्यांचे कारण काय असेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता ग्रामीण पोलीस या दोघांचा शोध कसा लावतात याकडे तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.