रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थ विक्रीचा विळखा वाढतच जात आहे. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील निवखोल येथे अमली पदार्थ विक्रीवर कारवाईत केली. या कारवाईत ३६ हजार ६०० रुपयांचा ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थ जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इबाबुल्ला मुजीब पावसकर (२६, रा. राजिवडा नाका, रत्नागिरी) असे अमली पदार्थ विक्री करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १३) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एका शाळेच्या पाठीमागे निवखोल रोड येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही भागात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधी पोलिसांनी एका शासकीय महाविद्यालयाच्या रस्त्यावर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी पोलिसांनी निवखोल येथील एका शाळेच्या पाठीमागे ही कारवाई केली. या कारवाईत संशयित पावसकर यांची चौकशी केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४ ग्रॅम वजनाचा व ३६ हजार ६०० रुपयांचा प्लास्टिक पिवशी सापडली. त्यामध्ये ब्राऊन हेरॉईन हा अमंली सदृश्य पदार्थ विक्रीकरिता बाळगलेल्या स्थितीत संशयित सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.