निलिमा चव्हाण हिचा घातपातच, नाभिक समाजाकडून चौकशीची मागणी

खेड:- निलिमा चव्हाण हिचा घातपातच झाला असल्याचा दाट संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी. निलिमाच्या मारेकरांचा 12 ऑगस्ट 2023 पर्यंत शोध पोलिसांकडून घेतला गेला नाही, तर कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधव हे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाला बसतील आणि मग त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर पोलीस प्रशासनच त्याला जबाबदार राहील, असा थेट इशाराच दापोली पोलीस ठाण्यात निवेदन देत जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी दिला आहे.

दापोली येथून चिपळूण ओमळी येथील आपल्या घरी जायला निघालेली निलिमा सुधाकर चव्हाण ही तिच्या घरी पोहोचली नाही. यामुळे तिच्या नातेवाईकांनी निलिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यानुसार दापोली पोलिसांचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उसगाव येथील जे. एस. डब्ल्यू जेटीच्या खाडीच्या पाण्यात सापडून आल्याने मोठीच खळबळ उडाली.

चिपळूण तालूक्यातील मूळ गाव ओमळी येथील रहिवाशी असलेली निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत कार्यरत होती. ती शनिवारी दि. 29 जुलै 2023 रोजी दापोलीहून घरी ओमळी ता. चिपळूण येथे येण्यास निघाली, पण ती ओमळी गावी तिच्या घरी पोहोचलीच नाही. दरम्यानच्या काळात दि. मंगळवारी 1 ऑगस्ट 2023 रोजी निलिमाच्या वयाचे साधर्म्य असलेला एक अनोळखी स्त्री देहाचा मृतदेह दापोली तालुक्यातील उसगाव येथील जे.एस. डब्ल्यू जेटी खाडीच्या पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आला. याची खबर मिळताच दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यासह उसगाव येथील घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मृदुळा मिलिंद गोयथळे, उपसरपंच चेतन रामाणे, मिलिंद गोयथळे, आगरवायंगणी ग्राम पंचायतीचे सरपंच संतोष आंबेकर, उसगाव तंटामुक्त अध्यक्ष उपस्थित होते. घटनेचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह दापोली उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान बेपत्ता झालेल्या निलिमा सुधाकर चव्हाण हिचा हा मृतदेह आहे का ? याबाबत चौकशी सुरू झाली असता तिच्या नातेवाईकांनी हा मृतदेह निलिमाचाच असल्याची ओळख पटवून सांगितले. निलिमा आयुष्य संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलेल, असे तिच्या नातेवाईकांना वाटत नाही. हा घातपातच असल्याचा संयश तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी केलेल्या संयशयाचा छडा लागण्यासाठी जिल्हाभरातील नाभिक समाज एक झाला असून दापोली उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड, दापोली आदी ठिकाणच्या तालुक्यातील समाज बांधवांनी धाव घेत नातेवाइकांना धीर देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात निवेदन देत या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. 12 ऑगस्टपूर्वी आरोपींना बेड्या ठोकण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव हे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाचा मार्ग पत्करतील आणि मग यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच, तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असे सांगितले.