नियमबाह्य लसीकरण प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी होणार

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जि. प. प्रशासनाला पत्र 

रत्नागिरी:- नियम धाब्यावर बसवून लसीकरण केल्याचा ठपका ठेवत कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली आहे. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून उचित कार्यवाही करावी, असे पत्रच जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आठवडा बाजार येथील लसीकरण चांगलेच भोवणार आहे. 

आठवडा बाजार येथील एका मंगल कार्यालयात लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती. त्याला राजकीय रंग देण्यात आला होता. लसीकरणाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने पहिल्यांदा आक्षेप नोंदवला. लसीकरण प्रशासनामार्फत राबवायचे असते. असे असताना एका राजकीय पक्षाला लसीकरण करण्याचा कॅम्प कसा काय मिळू शकतो? असे बरेच मुद्दे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी उपस्थित केले. यासंदर्भात अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. नियम धाब्यावर बसवून लसीकरण मोहिम राबवणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.

याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी  यांना लेखी पत्र पाठविले आहे. या पत्रातील मुद्द्यांबाबत आपल्या स्तरावर चौकशी करून कोविड-19 च्या अनुषंगाने नियोजित कार्यवाही करून तक्रारदारांना परस्पर कळविण्यात यावे, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून  तहसीलदार सर्वसाधारण जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या सहीनिशी हे पत्र पाठविण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात कशा प्रकारे चौकशी करणार, त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का? असे बरेच प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत.