निधी वितरणात समान वाट्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक: नाना पटोले 

रत्नागिरी:- राज्यातील सरकार हे उद्धव ठाकरे यांचे आहे, दुसरे कुणाचे नाही. आमच्या मागण्या विधीमंडळाचा प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडल्या आहेत. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून निधी वितरणात मी स्वतः लक्ष घालणार आहे, असे आश्‍वासन दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले.

रत्नागिरीत ओबीसी मेळाव्या नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्यामुळे निधी त्यांच्याकडील खात्याच्या मंत्र्यांना अधिक मिळतो अशी चर्चा सुरु असल्याचा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर श्री. पटोले म्हणाले, कोरोनातील परिस्थितीमुळे उपलब्ध निधीत राज्याचा गाढा हाकला जात होता. तरीही महाविकास आघाडीच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे मंत्र्यांना निधी मिळाला पाहीजे. त्यामधूनच राज्याचा सर्वागिण विकास होऊ शकतो हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे मांडले. त्यांनीही मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. यामध्ये आम्ही समाधानी आहोत. शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात लूट झाली. याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे. त्यासाठी ईओडब्लूसारख्या यंत्रणांचा वापर करावा. गृहमंत्र्यांनीदेखील यामध्ये लक्ष घालावे. ही चौकशी ठराविक टाइम बॉण्डमध्ये झाली पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे मंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेतील. मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयात असा दरबार होईल. कोरोनामुळे मंत्र्यांना काम करण्यासाठी संधी कमी मिळाली. तरीही काही महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. ते जनतेपर्यंत पोचवण्याचे काम मंत्री करणार आहेत.

किरीट सोमय्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांविषयी पटोले म्हणाले, कोणीही उठतो आणि वक्तव्य करतो अशी परिस्थिती आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील लोक भ्रष्टाचारी आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भुंकणार्‍या कुत्र्यांच्या तोंडी आपण लागत नाही, अशी एक म्हण आहे. मी कुणाला कुत्रा म्हटलेलं नाही. कोर्ले गावातील घरांसंदर्भात सोमय्या मुख्यमंत्र्यांवर बोलत आहेत. प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली. तर त्यांना घर दिसली का. काहीही आरोप करायचे, नुसता थयथयाट करायचा, याला काहीच अर्थ नाही. जेथे काहीच नाही, तेथे मुख्यमंत्री कशाला बोलतील असे सांगत पटोले यांनी पाठराखण केली.