रत्नागिरी:-ना. नारायण राणे यांच्यावरील कारवाई ही पुर्वनियोजीत प्लॅन होता किंवा कारवाईसाठी दबाव होता, ही बाब खोटी आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची भुमिका कायदेशीर आणि योग्य होती. त्यामध्ये कोणतीही सुडबुद्धी किंवा दबाव नव्हता अशी प्रतिक्रिया शिवसेनेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रनप येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये आदी उपस्थित होते. राणे यांची अटक हा पुर्व नियोजित कट होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला जात होता, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याअनुषंगाने आरोपांचा रोख होता.
यावर बोलाताना उदय सामंत म्हणाले, नारायण राणे यांची अटक ही कायदेशीर प्रक्रिया होती. त्यामध्ये कोणाचाही व्हिडिओ व्हायरल झाला त्याचा तपास करावा लागेल, त्याची खात्री करणे गरजे आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त श्री. पांडे यांची भुमिका कायदेशीररित्या केली. कोणाचाही दबाव नव्हता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. यावर ना. सामंत म्हणाले, कायदे तज्ञांनी सांगितले की ती कायदेशीर बाब होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यावर बोलणे योग्य नाही.
ना. राणे किंवा भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेला अटकाव घालण्यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे का, यावर सामंत म्हणाले, पुढील पंधरा दिवसात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती उत्सव आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोणाची यात्रा अडवावी किंवा जनआशिर्वाद थांबवावे, यासाठी नाही. जिल्ह्याची परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात घेतलेला हा निर्णय आहे.