ना मृदुंग, ना टाळ…रत्नागिरीत कार्तिकी एकादशी साधेपणाने साजरी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात कार्तिकी एकादशीचा उत्सव आज अत्यंत साधेपणाने साजरा झाला. ना मृदुंग, ना टाळ, ना दिंड्या, ना दर्शनासाठी गर्दी, ना भाविकांनी फुलून गेलेले रस्ते अगदी साध्या पद्धतीने प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला.

कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील ऐतिहासिक श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा करण्यात आली. पराग तोडणकर व सौ. तोडणकर यांच्या हस्ते पूजा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येणाऱ्या भाविकांना आज केवळ मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरात फार गर्दी झाली नाही. येणाऱ्या भाविकांनी रांगेत राहून दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षी होणारी रथयात्रा आणि जत्रा यंदा कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे झाली नाही. गर्दी होऊ नये आणि रस्त्यावर फेरीवाले येऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.