रत्नागिरी:- मागील अनेक दिवसांपासून जिल्हा वासीयांना असणारी पालकमंत्र्यांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांना रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. 9 ऑगस्टला झालेल्या विस्ताराला दीड महिना उलटल्यानंतर अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांचं वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. जिल्ह्यातीलच रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या ना.सामंत यांची अनेक वर्षांपासून मतदारसंघावर असलेली पकड आता आणखी मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा तसेच कोकणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या रायगडावर आता त्यांचे कितपत वर्चस्व वाढते हे येणार्या विविध निवडणुकांमधून दिसून येणार आहे. मविआ सरकारमध्ये ना. सामंतांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी होती.