नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रत्नागिरीच्या अनुज साळवीची निवड

नोव्हेंबरमध्ये जाणार प्रशिक्षणासाठी अमेरिकेत

रत्नागिरी:- अमेरिकेतील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम)घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थ्यांमधून रत्नागिरी जिल्ह्यातील नवोदय विद्यालयचा विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची निवड झाली आहे. त्याच्या निवडमुळे जिल्ह्यामधून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नोव्हेंबरमध्ये अकरा विद्यार्थी अमेरिकेत रवाना होणार आहेत.

अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात 26 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेमधून अनुज साळवी याची निवड झाली.आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली. यात निवड झालेले विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा विद्यार्थीदशेतच अभ्यास करायला मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येणार असून, अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. त्यांचा सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे.
जगातील 195 देशांपैकी फक्त 72 देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले आहे. याच ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका होती. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका होत्या, असे स्वान फाऊंडेशनच्या सुदेष्णा परमार यांनी सांगितले. या परीक्षेतून अकरा विद्यार्थ्यांची प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या अनुजवर जिल्हाभरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आबलोली सरपंच संदेश साळवी यांचा अनुज हा सुपुत्र आहे. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी अनुजचे विशेष अभिंनदन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी या परीक्षेला बसावे असे आवाहनही त्यांनी केले.
निवड झालेल्या अनुज व अन्य विद्यार्थ्यांचा राज्याचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रवीण दराडे, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते 2 सप्टेंबर रोजी पुणे येथे विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे.