रत्नागिरी:- तिकिट वाटपावर चर्चा सुरु असताना महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास पूर्ण ताकदीने काम करुन, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चोविस तास उरले असल्याने महायुतीतील उमेदवाराचा संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले. उमेदवारीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती. चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणची जागा ही शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली होती. धनुष्यबाण हा कोकणातील घराघरात पोहोचलेला आहे. त्यामुळे मतदारांना शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह माहित आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे विजयाचे गणित फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात आले होते, असे उदय सामंत यांनी सांगितले.
उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर किरण भय्या सामंत यांनी तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर कुटुंबासोबत देखील चर्चा झाली. नारायण राणे ज्येष्ठ नेते असून ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली तरी आपण शिवसेना म्हणून पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणाने काम करु, असे ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता महायुतीसोबत आहे. महायुतीतील तेढ राहू नये आणि इंडिया आघाडी आणि त्यांचे खासदार निवडून न येणे, यासाठी किरण सामंत यांनी घेतला. उदय सामंत यांचे पुनवर्सन करण्याची धमक कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे सामंत यांनी सांगितले.विजयाकडे एखाद्या उमेदवाराला कसे न्यायचे हा इथला पॅटर्न आहे. वरिष्ठ नेतृत्वाने येथील परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतल्याने चार पावले मागे येण्याचा निर्णय इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.
महायुतीत मीठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता शिवसेनेने घेतली आहे. आता प्रचारात याबाबत दोन्ही बाजूने काळजी घ्यायला हवी, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कोणतीही अपेक्षा न ठेवता किरण सामंत यांनी हा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वी केलेले ट्विट हे सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच करण्यात आले होते, असे उदय सामंत यांनी सांगितले. भाजपच्या एका नेत्याने कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र किरण सामंत यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहत हा प्रस्ताव नाकरला. हा किरण सामंत यांचा मनाचा मोठेपणा असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.