रत्नागिरी:- तालुक्यातील सड्ये-पिरंदवणे येथे नारळीच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढलेला प्रौढ पडला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. योगेश शंकर धुमक (वय ४२, रा. सड्ये पो. पिरंदवणे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश रविवारी दुपारी जेवणखाण आटोपल्यानंतर कोतवडे येथील रजनिकांत ठोबरे (रा. कोतवडे) यांच्या नारळ बागेत नारळ काढण्यासाठी गेले होते. ३० फुटा उंचीच्या माडावर नारळ काढत असताना झावळीला हात घातला असता झावळ अचानक तुटल्याने नारळीच्या झाडाला चिकटून ते १० फुट खाली येऊन पडले त्यांच्या छातीच्या बरगडीला, हाताला व पायाला दुखापत झाली. अधिक उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.