नाणारच्या रिफायनरी प्रकल्प उभारणीला पूर्णविराम

ना. सामंत; प्रदूषण विरहित उद्योग आणण्यावर भर

रत्नागिरी:-  रत्नागिरी जिल्ह्यात प्रदुषण विरहीत उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक झाली. आज त्यावर अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच राजापूर तालुक्यातील नाणार येथे रिफायनरी आणण्याच्या प्रश्‍नाला पूर्ण विराम मिळाला असून त्या ठिकाणी प्रदुषण विरहीत दुसरा उद्योग येऊ शकतो असा सुतोवाच सामंत यांनी झूम अ‍ॅपवरील पत्रकार परिषदेत केला.

कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रदुषण विरहीत प्रकल्प आणण्याचा निर्णय होत आहे. या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा उद्योग निर्मितीमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर होणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला असल्याने त्या विषयीचे उपक्रम तिकडे आणले जाणार आहेत. नाणार येथील रिफायनरीसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, नाणार येथे रिफायनरी प्रकल्प येणार नाही हा शिवसेनेचा निर्णय आहे. तो विषय केव्हाच संपलेला आहे. त्या ऐवजी नाणारला अन्य प्रदुषण विरहीत उद्योग येऊ शकतो. रिफायनरीला ज्यांचा पाठींबा आहे, ते स्थानिक आहेतच असे नाही. रोजगारांसाठी सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकार विचार करत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पाहणीसाठी वेगळा दौरा करण्याची गरजच नाही. गेल्या दोन दिवसात झालेल्या दौर्‍यातून महामार्ग कसा आहे, याची चाचपणी झालेली आहे. पावसामुळे काही टप्प्यांमध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे. आरवली ते लांजा हा रस्ता चांगला आहे तर आरवली ते खेड भागातील रस्त्यात खड्डे आहेत. पनवेलपासून पुढे सिंधुदुर्गपर्यंत टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती आहे; परंतु गतवर्षीपेक्षा यंदा परिस्थिती चांगली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 85 टक्के रस्ता सुस्थितीत आहे, असे सामंत यांनी सांगितले.

लॉकडाऊन संदर्भात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात हे मला माहिती नाही. मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले तर कदाचित तसा निर्णय घ्यावा लागेल. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. साखरपा, लांजा येथे स्वतःहून लॉकडाऊन केले गेले आहे. त्याचा परिणाम निश्‍चित होईल. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये 70 टक्के मृत रुग्ण हे 65 वर्षांवरील आहेत. त्यांना विविध आजारांची पार्श्‍वभुमी आहे. तरीही हा मृत्यू दर कमी आणण्यासाठी टास्क फोर्सची बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील, असा विश्‍वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. कोरोना तपासणीसाठी खासगी डॉक्टर्सनी तयारी दर्शवली आहे. गरज लागली तर त्यादृष्टीने विचार केला जाईल.