राजापूर:- राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही दिवसांपासून काही इसम अंमली पदार्थाची खरेदी – विक्री करत असल्याबबत माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. अविनाश केदारी, नाटे पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा श्री. यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली व सहायक पोलीस निरीक्षक श्री. अविनाश केदारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गठित करण्यात आले. या पथकामार्फत नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त घालत असताना तसेच सहायक पोलीस निरीक्षक श्री. अविनाश केदारी यांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार दिनांक 02 जुलै रोजी कारशिंगे एस.टी. पिकअप शेडच्या पाठीमागे असणाऱ्या एका तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कौलारू शेड मध्ये दोन इसम हे आपल्या ताब्यात गांजा हा अमली पदार्थ बाळगल्या स्थितीत मिळून आले. या पथकामार्फत दोनही इसमांची जागीच अंगझडती घेण्यात आली व त्यांच्याकडे, 2 किलो 5 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे तसेच त्यांच्याकडून एक यामाहा कंपनीची मोटरसायकल व दोन मोबाइल असा एकूण ₹90,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
प्रवीण आत्माराम गुरव, वय 50, रा. वारगाव, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग व दिलीप भास्कर घाडी, वय 56, रा. तरळ, ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले व नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 43/2023 एन.डी.पी.एस कायदा 1985 चे कलम 8(क), 20(ब) 2 (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
सदर कारवाई सपोनि अविनाश केदारी, प्रभारी अधिकारी नाटे पोलीस ठाणे, सपोफौ विवेक साळवी, सपोफौ संजय झगडे, पोशि दिगंबर ठोके, पोशि कोरे व चा. पोशि नरेश ठिक आदी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.