रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे येथे विवाहितेने अज्ञात कारणातून घरातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेरणा प्रताप कोरपे (वय 37,रा.नाखरे,रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ दत्ताराम देऊ जोशी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. आज सकाळी प्रेरणा हिच्या शेजार्यांनी दत्तारामला फोन करुन त्याच्या बहिणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती दिली. प्रेरणाचे पती प्रताप कोरपे आज पहाटे ५ वाजता नोकरीवर निघून गेले होते.त्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या शेजार्यांना प्रेरणा घराच्या ओटीवर नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने याबाबत दत्तारामला माहिती दिली. दत्तारामने याबाबत पूर्णगड पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलिस हवालदार संदेश चव्हाण करीत आहेत.