पर्ससीन मासेमारीवर मात्र आणखी एक महिना निर्बंध
रत्नागिरी:- शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंदी कालावधी 31 जुलैला संपुष्टात आला. त्यामुळे 1 ऑगस्टला समुद्रावर स्वारी करण्यासाठी ट्रॉलिंग, गिलनेटने मासेमारी करणारे सज्ज झाले आहेत. पावसाने विश्रांती घेतली असून वार्यांचा वेगही कमी झालेला आहे. मासेमारीला पोषक वातावरण असल्यामुळे शासकीय मुहूर्त साधण्यासाठीची तयारी मच्छीमारांनी केली आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात चिंगळं सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भर पावसाळ्यात समुद्र किनारी मासे प्रजननासाठी येत असल्यामुळे 1 जुन ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंद ठेवली जाते. समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारही नौका किनार्यावर सुरक्षित उभ्या करुन ठेवतात. जुलै महिन्याच्या दुसर्या पंधवरडयात वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमारांनी नौकांच्या दुरुस्तीला सुरुवात केली गेली. शाकारलेल्या नौकांना तळातील बाजूने रंग काढण्यात येत असून उचकटलेल्या फळ्यांची दुरुस्ती केली जात आहे. ही कामे अंतिम टप्प्यात असून काहींनी नौका खाडी किनारी उभ्या केलेल्या आहेत. ट्रॉलर्सद्वारे मासेमारी करण्यासाठी तांडेलासह सात खलाशी लागतात. त्यात काही परजिल्ह्यातील लोकही काम करतात. त्यांच्याशी आठ दिवसांपूर्वी चर्चा करून रत्नागिरीत आणले गेले आहे. गिलनेटच्या नौका चालवणारे हे बहुसंख्य स्थानिक मच्छीमार आहेत. 1 ऑगस्टला वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार समुद्रावर स्वार होणार आहेत. मागील आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला असून खवळलेला समुद्रही शांत झाला आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे बंदी उठण्याची प्रतीक्षा मच्छीमारांना आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजाराहून अधिक मच्छीमार आहेत. पहिल्या दिवशी दहा ते पंधरा टक्के मच्छीमार मुहूर्त साधतात. बहुसंख्य मच्छीमार हे नारळी पौर्णिमेला पारंपरिक पद्धतीने समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरवात करतात. सध्या प्राथमिक अंदाजानुसार मच्छीमारांच्या जाळ्यात कोळंबी मिळण्याची दाट शक्यता आहे. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारी सुरू झाल्यानंतर 1 सप्टेंबरला पर्ससिननेटने मासेमारीला आरंभ होतो.