रत्नागिरी:- रत्नागिरीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या एका थेंबावरून शरीरातील आजाराचा निष्कर्ष काढणारे मशीन उपलब्ध होणार आहे. हे ‘हेल्थ एटीएम किसॉक’ नामक मशीन पाच मिनिटात 50 रुग्णांच्या तपासण्या करण्याची क्षमता ठेवणारे आहे. मुंबईसह कोकणात कुठल्याही रुग्णालयात हे मशीन उपलब्ध नाही. हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात या मशीनद्वारे तपासणी शिबीरे घेतली जाणार असल्याचे हॉस्पिटलचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
रत्नागिरीतील मजगांव रोड येथे लो. बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकार्पण केले. 50 खाटा असलेल्या या हॉस्पिटलची सेवा कॅशलेस असून ते पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी 20 दिवस लागणार आहेत. शासनाकडून रुग्णांना कुठल्या योजनेतून उपचार व इतर सेवा द्यायच्या याचे निर्देश यायचे आहेत. हे निर्देश येण्यासह डॉक्टर्स व इतर स्टाफ रुजू होण्यासाठी हा कालावधी लागणार आहे. ग्रामीण भागात आर्थिक अडचणींमुळे आजार अंगावर काढले जातात. या पार्श्वभूमीवर तपासणी करणार्या नवीन आधुनिक मशिनची सेवा ग्रामीण भागातही द्यावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्रस्टला केल्या आहेत. ‘हेल्थ एटीएम किसॉक’ मशीनने लगेचच रिपोर्ट येत असल्याने छोटा आजार असताना कमी उपचारावर भागणार आहे. जागेवरच तपासणी रिपोर्ट मिळणार असल्याने मृत्यूवर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे.