मिठगवाणेच्या सरपंच साक्षी जैतापकर यांचा उपोषणाचा इशारा
रत्नागिरी:- नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी बोगस प्रवेश दाखवून शासनाची फसवणूक करणार्या मुख्याध्यापकाला पाठीशी घालणार्या शिक्षण विभागाविरोधात मिठगवाणेच्या सरपंच साक्षी जैतापकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी उपोषणाची नोटीस प्रशासनाला दिली होती. मात्र वारंवार मनधरणी करून मुख्याध्यापकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाल्याने १५ ऑगस्ट रोजी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहेत.
राजापूर तालुक्यातील जानशी येथील साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करणार्या बलवंत सुतार यांच्याविरोधात साक्षी जैतापकर यांनी अनेक पुरावे देऊन नवोदयसाठी जानशी येथील साने गुरूजी विद्यालयात बोगस प्रवेश प्रक्रिया राबविल्याची तक्रार केली होती. त्याविरोधात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र कारवाईचे आश्वासन देऊन मुख्याध्यापकांवर कोणतीच कार्यवाई आजतागायत न झाल्याने जैतापकर यांनी उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे.
नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी सर्वच पालक प्रयत्नशील असतात. मात्र जानशी येथील मुख्याध्यापक बलवंत सुतार यांनी परजिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत असल्याचे दाखवून त्या मुलांचे प्रवेश नवोदयसाठी केल्याचा आरोप जैतापकर यांनी केला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करून परजिल्ह्यातील विद्यार्थी आर्थिक साटलोट करून बोगस प्रवेश दाखवण्याचा कारनामा मुख्याध्यापकांनी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.
ज्यावेळी तक्रार दाखल झाली त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवला होता तसेच प्रत्यक्ष तपासणी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकार्यांना पाठविला होता. या अहवालात मुख्याध्यापक दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
मुख्याध्यापक दोषी असल्याचा अहवाल आला असताना या मुख्याध्यापकांवर कोणतीच कारवाई न करता वारंवार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे. शिक्षण विभागातील काही कर्मचार्यांचे मुख्याध्यापकांशी लागेबांधे असल्याचा आरोप सरपंच जैतापकर यांनी यावेळी केला आहे.
शालेय पोषण आहारातदेखील अफरातफर झाली असल्याचा आरोप करून पोषण आहाराचे पैसे लाटण्यासाठी त्याच शाळेत शिक्षक असलेल्या पत्नीच्या नावाने एक बचत गट काढून त्या बचत गटाच्या माध्यमातून अपहार केल्याचा आरोप साक्षी जैतापकर यांनी केला आहे. तसेच ७५ हजार रूपयांचा चेक स्वत:च्या नावावर वटवल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
नेहमीच वादात राहिलेल्या या मुख्याध्यापकाने आता पैसे गोळा करण्याचा नवा फंडा अवलंबला आहे. संस्था वादातीत असल्याचा फायदा घेत शिक्षक पालक संघ नावाने बँकेत खाते काढून मुलांकडून शाळेच्या डागडुजीसाठी वर्गणी जमा करण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्याच्या पावत्यादेखील जैतापकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या.
२०२० पासून हा लढा सुरू आहे. आजपर्यंत मुख्याध्यापकावर कोणतीच कारवाई न झाल्याने मिठगवाणेच्या सरपंच साक्षी संतोष जैतापकर यांनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.