पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी; शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात
रत्नागिरी:- नवीन शासन अध्यादेशामुळे जिल्ह्यातील 491 कंत्राटी शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. आधीच चार महिने पगार न झाल्याने हैराण झालेले हे कंत्राटी शिक्षक नवीन शासकीय अध्यादेशामुळे निराश झाले आहेत. या नवीन अध्यादेशामुळे शासनाने नियुक्ती केलेल्या जिल्हा परिषद व रत्नागिरी नगर परिषद शाळांमधील कंत्राटी शिक्षकांना आता नोकरीही गमवावी लागणार आहे. तरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देवून या शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करून या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. या शिक्षकांना सामावून न घेतल्यास शिक्षक आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत.
शासन अध्यादेशानुसार राज्यातील 10 व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद व नगरपरिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने कंत्राटी शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला दिलेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्यात आलेत. रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर 2024 मध्ये पहिल्या टप्यात काही शिक्षक तर नोव्हेंबरमध्ये दुसर्या टप्यात असे एकूण 491 कंत्राटी शिक्षकांना शासन अध्यादेशाप्रमाणे नियुक्त पत्र देण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात नियुक्त झालेल्या शिक्षकांना विद्यमान पालकमंत्री व आमदार उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले होते. दरम्यान या शिक्षकांचे माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी असे चार महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्याने या शिक्षकांवर व त्यांच्या कुटुबांंवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही हे शिक्षक आपले काम प्रमाणिकपणे करित आहेत. जुन्या शासकीय अध्यादेशामध्ये चांगले काम करणार्या शिक्षकांना पुढील शैक्षणिक वर्षात पुनर्नियुक्ती दयावी, असे आदेश होते, मात्र दि. 10 फेब्रु. 2025 रोजी शासनाने काढलेल्या नवीन अध्यादेशामध्ये सदर शिक्षकांची पुनर्नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे.
तरी शासनाने या शिक्षकांना पुनर्नियुक्ती दयावी, त्यांना सेवेत कायम सामावून घ्यावे तसेच ज्या कंत्राटी शिक्षकांनी पवित्र पोर्टलव्दारे शिक्षक भरती प्रक्रियेत नाव नोंदणी केली आहे, त्यांना दुसर्या टप्प्यातील पवित्र पोर्टलव्दारे शिक्षक भरतीत प्राधान्य क्रमाने संधी दयावी, अशीही मागणी होत आहे. पालकमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षकमंत्री यांच्यामार्फत या शिक्षक न्याय देतील, अशी अपेक्षा या शिक्षकांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.