गुहागर:- तालुक्यातील शृंगारतळी येथील मुख्य मार्गावर असलेल्या गणेशनगर येथील बंगल्याच्या मागचे दार फोडून कपाटामधील सोने व रोख रक्कम अशी एकूण दीड लाखाची चोरी झाल्याची घटना घडली. दि. 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत ही घटना घडली असून, नववर्षाच्या पूर्वसंध्येला या चोरीच्या घटनेने शृंगारतळीवासीयांची झोप उडवली आहे.
शृंगारतळी गणेशनगर येथील जालिंदर जाधव यांनी याबाबतची फिर्याद गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली. ते दि. 21 ते 31 डिसेंबर यादरम्यान गावी गेले असता गणेशनगर येथील त्यांच्या घराचे मागचे दार फोडून घरामध्ये प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील सोने व अन्य वस्तू असे एकूण दीड लाखाचा ऐवज अज्ञाताने लंपास केला आहे. याबाबतची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप भोपळे पुढील तपास करत आहेत.