नळपाणी योजनेची पाईप टाकताना गॅस पाईपलाईन फुटली

रत्नागिरी:- शहरातील नाचणे पॉवर हाऊस येथून शिवाजी नगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर नळपाणी योजनेचे काम चालू असताना खोदाई दरम्यान गॅस पाईपलाईन फुटल्याने एकच गोंधळ उडाला. गॅस पाईपलाईन फुटल्याने गॅस लिक झाला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. अशोका गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी टॅपिंग करून पुरवठा पूर्ववत केला. 

रत्नागिरी शहरात गॅस आणि नळपाणी योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. निम्म्या शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. गॅस पाईपलाईनच्या बाजूनेच पाणी योजनेसाठी पाईपलाईन टाकली जात आहे. पाण्याचे भलेमोठे पाईन टाकण्यासाठी जेसीबी आणि ब्रेकरच्या मदतीने रस्ते खोदाई सुरू आहे. गॅस पाईपलाईनच्या बाजूनेच खणल्या जाणाऱ्या चरामुळे मोठा धोका संभावित आहे.
 

याचाच प्रत्यय शुक्रवारी नाचणे परिसरात आला. नाचणे पॉवर हाऊस येथे पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना अचानक गॅस पाईपलाईनला धक्का लागला आणि गॅस पाईपलाईन फुटली. अवघ्या काही मिनिटात गॅसचा वास सर्वत्र पसरला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. खबरदारी म्हणून हा रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला. गॅस कंपनीचे अधिकारी देखील तात्काळ घटनास्थळी पोहचले. परिसरात गॅसचा मोठ्या प्रमाणावर वास येऊ लागल्याने आजूबाजूच्या इमारती मधील वीजप्रवाह बंद करण्यास सांगण्यात आला. गॅस कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत फुटलेल्या ठिकाणी टॅपिंग केले. यामुळे पुढील धोका टाळला।