रत्नागिरी :- कोरोना सारख्या अनोख्या युद्धात आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थीनींना कोरोना मुक्त करण्यात जिल्हा शासकिय रुग्णालयाला यश आले आहे. बुधवारी पाच विद्यार्थींनी कोरोना मुक्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्याचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नर्सिंग महाविद्यालयातील एकूण सात विद्यार्थींनींना कोरोनाची लागण झाली होती.
रत्नागिरी शहरातील राजिवडासह साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींना त्या भागात सर्व्हेसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर सुमारे महिनाभरानंतर एका विद्यार्थीनीला कोरोनाची बाधा झाल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण सात विद्यार्थींनींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु होते.
सातपैकी पाचजणींची प्रकृती पुर्णत: बरी झाली असून त्या कोरोना मुक्त झाल्या आहेत. बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, बालरोग तज्ञ डॉ.दिलीप मोरे यांच्यासह सहकारी कर्मचार्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोना मुक्त केल्याबद्दल त्या विद्यार्थीनींनी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्यांसह कर्मचार्यांचे आभार मानले आहेत.