नरेगाचा हजेरीपट निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांवर

रत्नागिरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा)च्या कामावरील हजेरीपट (ई मस्टर) निर्गमित करण्याची जबाबदारी आता ग्रामरोजगार सेवकांवर देण्यात येणार आहे. यामुळे तालुकास्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरुन ई-मस्टरचे हे काम केल्यास ही कामे वेळेत होणार आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर मग्रारोहयोचे अभिलेखे व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामात ग्रामसेवकाला मदत करण्याची व संगणकीय माहिती इत्यादी भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्रामरोजगार सेवकांच्या सेवा ग्राम पंचायतीमार्फत घेतल्या जातात.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अभिलेखे व नोंदवह्या ठेवण्याची जबाबदारी व ग्रामसेवकांना सहाय्य म्हणून मदत करण्याची प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची असते. मनरेगा अंतर्गत ग्रामसेवकाला मदत करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांच्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत घेण्यात आल्या आहेत व त्यांच्या सेवा उपयुक्त ठरल्या आहेत. हजेरीपट ग्रामपंचायत स्तरावरुन निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अवलंबिल्यास मजुरांची मागणी प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर न जाता ग्रामपंचायत स्तरावरुन करुन हजेरीपटाची प्रत वेळीच घेतल्यास ग्रामरोजगार सेवकाला तालुकास्तरावर कामाच्या मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहचविण्याकरीता लागणारा कालावधी वाचेल. तसेच डाटा एन्ट्रीकरीता होणारा विलंब टाळता येणार आहे. त्यामुळे नरेगाच्या कामावरील हजेरीपट निर्मित करण्याची जबाबदारी आता ग्रामरोजगार सेवकावर आली आहे.