नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी आजपासून संपावर

रत्नागिरी:- राज्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती मधील कामगार, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांना मुख्यमंत्री यांनी सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. पण तरी देखील काही अधिकारी त्याला हरताळ फासत आहेत. अशा अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी मंगळवार 6 ऑगस्ट 2024 पासून कामकाज बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट 2024 रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई यादरम्याने लॉंगमार्च काढण्यात येणार आहे.

या आंदोलनसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही रत्नागिरी दौर्‍यात येथील कर्मचारी संघटनेने निवेदन दिले आहे. राज्यातील सर्व नगरपरीषदा आणि नगरपंचायती मधील कामगार कर्मचारी, संवर्ग कर्मचारी यांना तसेच ज्या संघटना खऱ्या अर्थाने कामगारांचे हिताचा विचार करत आहेत त्यांना या आंदोलनासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने राज्याचे निमंत्रक डॉ. डि. एल. कराड, ॲड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, मुख्य संघटक ॲड. संतोष पवार, ॲड. सुनिल वाळूंजकर आणि समन्वयक अनिल जाधव यांनी 6 ऑगस्ट 2024 पासून कामकाज बंद आंदोलन तसेच 7 ऑगस्ट 2024 रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई यादरम्याने लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. संघटनेचे सर्व पदाधिकारी शासन दरबारी सर्व कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्या मान्य करून घेण्याबाबत जातीनिशी प्रयत्न करीत आहेत. तथापि शासनाने वेळोवेळी मागण्या मान्य करणे बाबत चालढकल केलेली आहे. शासन म्हणजे कोण आपलेच अधिकारी ज्यांनी सर्व लाभ आपल्या पदरात पाडून घेतलेले आहेत. परंतु त्यांच्याच अधिपत्याखालील नगरपरिषद कर्मचार्‍यांना ते लाभ देण्यासाठी चालढकल करीत आहेत. मुख्यमंत्री यांनी आपल्याला ते सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिलेली आहे. तरी देखील आपलेच अधिकारी त्याला हरताळ फासत आहेत म्हणून अशा अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी आता संघटनेने अंतिम पाऊल उचललेले आहे.

काम बंद आंदोलन आणि लॉंगमार्च काढला तरी देखील अधिकारी प्रशासनावर परिणाम झाला नाही तर संघटनेने 9 ऑगस्ट 2024 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तरी त्यांच्या या निर्णयाला सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांनी जोरदार पाठिंबा देऊन जसे शक्य होईल तसे या आमरण उपोषणामध्ये सहभागी व्हावे. आता नाही तर कधीच नाहा, कृपया कोणीही मागे मागे सर्वांनी आपले योगदान जरूर द्यावे तरच हे शासनाचे वरिष्ठ अधिकारी जागेवर येतील असे आवाहन कर्मचारी संघटनेने केले आहे.