रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 12 ते 18 मे या 7 दिवसांच्या काळातील कोरोना अहवाल जाहीर केला असून, या आठवड्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दरवाढ राज्यात सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वीच्या 5 ते 11 मे या 7 दिवसांच्या आठवड्यात सिंधुदुर्गची रूग्णवाढ राज्यात सर्वाधिक होती ती आता दुसर्या क्रमांकावर आली असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता रुग्णवाढ पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर वाढला असून हा दर राज्यात तिसर्या क्रमांकाचा आहे. राज्यात सर्वात कमी रुग्ण दरवाढ मुंबईची असून ती केवळ 0.23 टक्के इतकी राहीली आहे.
12 ते 18 मे या सात दिवसांच्या काळात रुग्णवाढीचा साप्ताहिक सरासरी दर रत्नागिरी जिल्ह्याचा 2.24 टक्के इतका नोंदला गेला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दर 2.17 टक्के इतका नोंदला गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर 1.71 टक्के इतका नोंदला गेला आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या शहरातीलही रूग्ण दरवाढ 1 टक्क्यापेक्षा खाली राहीली आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याची रुग्ण दरवाढ 2 टक्केपेक्षा अधिक असल्यामुळे या जिल्ह्यांची कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सरकारला आणि प्रशासनाला विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
लसीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर असून सर्वात जास्त लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा लसीकरण मुंबई व नागपूरमध्ये अधिक लसीकरण झाले आहे. 45 वर्षे वयावरील 2 लाख 48 हजार 326 इतक्या सिंधुदुर्गातील लोकांना लस देणे आवश्यक असताना आतापर्यंत 1 लाख 4 हजार 617 इतक्या लोकांना लस देण्यात आली आहे. हे प्रमाण 42.13 टक्के इतके आहे.