नऊ टक्के वाढीव दराने बांधकाम करण्यास ‘निर्माण’ राजी 

सोमवारी विशेष सभेचे आयोजन; भाजपच्या भूमिकेकडे नजरा 

रत्नागिरी:- पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या अंदाजपत्रकाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अंदाजपत्रकाच्या २० टक्के जादा दराने निविदा भरणाऱ्या निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने काहीसी माघार घेत ९ टक्के प्रमाणे म्हणजे १ कोटी ५७ लाख रुपयाला तोटा सहन करून इमारतीचे काम करण्यास तयारी दर्शविली आहे. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या या मागणीसाठी सोमवारी (ता.११) तातडीची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. विश्वासात न घेतलेल्या शिवसेनेच्या काही नाराज नगरसेवकांनीही वरिष्ठांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. 

शहरातील विविध विकास कामांचा ठेका निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी घेते. भाजपचे नगराध्यक्ष असताना काही हजार रुपयांचे देणे पालिकेकडुन रखडले होते. या कंपनीने नगराध्यक्षांपर्यंत पोहचण्यासाठी मध्यस्थी घालून ती रक्कम मिळवली होती. एवढी व्यवहारीक ही कंपनी आहे. मग तब्बल १ कोटी ५७ लाख रूपये कमी करून नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी कंपनीने कशी तयारी दर्शवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यासाठी निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरची निविदा आली होती. १४ कोटी २८ लाख ५४ हजार ८७ रूपये इतके या कामाचे अंदाजपत्रक आहे. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने ही निविदा भरून अंदाजपत्रकाव्यतिरिक्त २०.६७ टक्के म्हणजे २ कोटी ९५ लाख इतक्या वाढीव दराची मागणी केली. हा विषय मागील सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. इमारतीचे अंदाजपत्रक २०१९-२० मधील असल्याने राज्याच्या दर सूचीप्रमाणे इमारत उभारणीचे साहित्य, मजुरीचे दर वाढले असल्याने २०.६७ टक्के दरवाढ मिळावी, अशी मागणी निर्माण कंपनीने केली होती. परंतु, पालिकेच्या सल्लागार कंपनी असलेल्या अ‍ॅकोटेक कन्सल्टंटने काही झाले तरी दरवाढ ९.६५ टक्केच्या वर दरवाढ दने शक्य नाही, असा अभिप्राय दिला. त्यानुसार सर्वसाधारण सभेने निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरची वाढीव दराची मागणी फेटाळून लावत नव्याने अंदाजपत्रक बनवणे आणि निविदा प्रक्रिया करण्याचा ठराव सर्वानुमते केला.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत वाढीव दराची मागणी फेटाळण्यात आली.  आता निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने ९.६५ टक्के दराने प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यास तयारी दर्शवली आहे. या मागणीवर विचार करण्यासाठी तातडीची विशेष सर्वसाधारण सभा येत्या सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.