रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव हळूहळू वाढू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात 62 रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात 126 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासन सतर्क झाले आहे. ऐन शिमगोत्सवात रुग्ण वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.
गुरुवारी जिल्ह्यात 64 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक असून शुक्रवारी जिल्ह्यात 62 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,617 वर जाऊन पोहचली आहे. आज आलेल्या अहवालात 37 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 25 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात वाढत जाणारी रुग्णसंख्या ही चिंतेचा विषय असून प्रत्येक नागरिकाने आता जबाबदारीने वागत कोरोना संबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.